Joshua 18

1मग इस्राएलाची सर्व मंडळी शिलो येथे एकत्र झाली, आणि तेथे त्यांनी सभामंडप उभा केला, आणि त्यांच्यापुढे सर्व देश जिंकलेला होता. 2तरी ज्यांना आपला वतनाचा वाटा मिळाला नव्हता, असे इस्राएलाच्या लोकांपैकी सात वंश राहिले होते.

3यास्तव यहोशवाने इस्राएलाच्या लोकांस म्हटले, जो देश तुमच्या पूर्वजाचा देव परमेश्वर याने तुम्हास दिला, तो आपल्या ताब्यात घेण्यासाठी किती उशीर करणार आहात? 4तुम्ही आपल्यासाठी प्रत्येक वंशातली तीन माणसे नेमा; म्हणजे मी त्यास पाठवीन, आणि त्यांनी देशांत जाऊन चोहोकडे फिरून त्यांच्या वतनाच्या विभागाप्रमाणे, वर्णन लिहून माझ्याजवळ आणावे.

5म्हणजे त्यांनी त्याचे सात वाटे करावे; यहूदाने दक्षिणेस आपल्या सीमेत राहावे, आणि योसेफाच्या घराण्याने उत्तरेस आपल्या सीमेत राहावे. 6तसे तुम्ही देशाच्या वेगवेगळ्या सात वाट्याचे वर्णन करा आणि ते वर्णन इकडे माझ्याजवळ आणा; मग येथे आपला देव परमेश्वरासमोर मी तुमच्यासाठी चिठ्या टाकीन.

7लेव्यांना तर तुमच्यामध्ये वाटा नाही; कारण की परमेश्वराचे याजकपण तेच त्यांचे वतन आहे; आणि गाद व रऊबेन व मनश्शेचा अर्धा वंश यांचे, यार्देनेच्या पलिकडे पूर्वेस, जे वतन परमेश्वराचा सेवक मोशे याने त्यास दिले, ते त्यास मिळालेच आहे.

8तेव्हा ती माणसे तेथून निघून देशभर फिरले आणि यहोशवाने देशाचे वर्णन करणाऱ्यांना आज्ञा दिली; तो म्हणाला, देशात चोहोकडे फिरून त्याचे वर्णन करा आणि माझ्याकडे परत या. मी येथे शिलोत परमेश्वरासमोर तुम्हासाठी चिठ्या टाकीन. 9याप्रमाणे ती माणसे जाऊन देशभर फिरली, आणि त्यातील नगरांप्रमाणे त्यांच्या सात विभागाचे वर्णन वहीत लिहून शिलोतल्या छावणीत यहोशवाजवळ आणले.

10मग यहोशवाने त्यांच्यासाठी शिलोमध्ये परमेश्वरासमोर त्यांच्या नावाच्या चिठ्या टाकल्या; असे यहोशवाने तेथे तो देश इस्राएलाच्या लोकांस त्यांच्या त्याच्या वतन भागाप्रमाणे वाटून दिला.

11तेव्हा बन्यामीनाच्या वंशजास नेमून दिलेला प्रदेश त्यांच्या कुळांप्रमाणे चिठी टाकून जो वांटा मिळाला तो असा; त्यांच्या वाट्याची सीमा यहूदाचे वंशज व योसेफाचे वंशज यांच्या मध्यभागी निघाली. 12म्हणजे उत्तर बाजूस त्यांची सीमा यार्देनेपासून सुरू होऊन यरीहोच्या उत्तरेकडून वर जाऊन, पश्चिमेकडे डोंगरावरून बेथ-आवेनापर्यंत रानांत निघते.

13मग तेथून ती लूज तेच बेथेल येथे पोहचते आणि लूजच्या दक्षिण बाजूकडून निघून खालच्या बेथ-होरोनाच्या दक्षिणेस जो डोंगर त्याकडे अटारोथ-अद्दार येथे निघते 14तेथून मग पश्चिम सीमा वळसा घेऊन बाजूस बेथ-होरोनाच्या समोरून त्याच्या दक्षिणेस जो डोंगर तेथून यहूदाचे नगर आणि किर्याथ-बाल तोच किर्याथ-यारीम येथे निघते. याची पश्र्चिम सीमा हीच.

15दक्षिणेकडील सीमा पश्र्चिमेस सुरू होऊन बाजू किर्याथ-यारीमाच्या वरच्या टोकापासून निघून नेफ्तोहा झऱ्याकडे जाते. 16मग ती सीमा हिन्नोमाच्या पुत्राच्या खिंडीसमोरला डोंगर, जो रेफाईमाच्या तळवटीच्या उत्तरेस, त्याच्या काठी उतरली, आणि यबूसी यांच्या दक्षिण भागी हिन्नोम खिंडीत उतरून खाली एन-रोगेलास गेली.

17मग उत्तरेकडे वळून एन-शेमेशाकडे गेली, आणि अदुम्मीम येथील चढणीच्या समोरल्या गलीलोथाकडे गेली; मग रऊबेनाचा मुलगा बोहन याच्या खडकाकडे जाते. 18मग ती अराबा याच्या समोरल्या भागी उत्तरेस जाऊन अराबास उतरली.

19मग ती सीमा बेथ-होग्लाच्या उत्तर दिशेस जावून गेली, आणि सीमेचा शेवट क्षारसमुद्राच्या उत्तरेच्या खाडीपर्यंत दक्षिणेकडे यार्देनेच्या मुखापाशी झाला; ही दक्षिण सीमा झाली. 20आणि पूर्वबाजूस त्याची सीमा यार्देन नदी झाली; बन्यामीनाच्या संतानांचे वतन, त्यांच्या कुळाप्रमाणे, त्यांच्या चहुकडल्या सीमांप्रमाणे, हे होते.

21आणि बन्यामीन वंशाला त्यांच्या त्यांच्या कुळाप्रमाणे ही नगरे मिळाली; यरीहो व बेथ-होग्ला व एमेक-केसीस 22आणि बेथ-अराबा व समाराइम व बेथेल; 23अव्वीम व पारा व आफ्रा; 24कफर-अम्मोनी व अफनी व गेबा; अशी बारा नगरे आणि त्यांची गावे;

25गिबोन व रामा व बैरोथ; 26मिस्पा व कफीरा व मोजा; 27रेकेम व इपैल व तरला; सेला, एलेफ व यबूसी म्हणजेच यरुशलेम, गिबाथ, किर्याथ; अशी चवदा नगरे, आणि त्यांची गावे; बन्यामीनाच्या संतानांचे वतन, त्यांच्या कुळांप्रमाणे त्यांचे आहे.

28

Copyright information for MarULB